Wednesday, 11 January 2017

तू असशील

तू असशील
खोल हृदयाच्या पुन्हा कधीच न उघडलेल्या कप्प्यात
अन मृगजळाच्याही पलीकडे न पोहचणाऱ्या नजरेच्या टप्प्यात

तू असशील
मावळणाऱ्या सूर्याला निरोप देणाऱ्या किनाऱ्यापाशी
अन माझ्या  उधळलेल्या मनाला शांत करण्यासाठी

तू असशील
मनातल्या मनातच मला साद देणाऱ्या हर एक स्पन्दनाच्या आरोळीत

तू असशील
एकांतात.... अन गर्दीतही
नाराजीत .... अन मर्जीतही
पावसाच्या  पहिल्या थेंबात
आरशामधल्या प्रतिबिंबात
स्वप्नात अन कल्पनेत
सर्व काही व्यापलेल्या आठवणींच्या दुनियेत....!!!

सागर नाईकडे